एक अनपेक्षित घटना.
एलटीटीई नेहमी वापरात असणा-या रस्त्यांवर सुरुंगाचे स्फोट घडवून गाडी आणि त्यात बसलेल्या सैनिकांना लक्ष्य बनवत असे. सुरुंग वापरण्याची ही युक्ती श्रीलंकेच्या सैन्याशी लढताना सुरु झाली होती. बहुतांश वेळी सुरुंग बरेच आधी पेरून ठेवल्याने वरून काही दिसणे या समजणे कठीण होते. त्याचा स्फोट घडविण्यासाठी तार पुरून रस्त्यापासून थोड्या अंतरावर त्याचे टोक लपवून ठेवायचे. योग्य वेळी एलटीटीईचा माणूस रस्त्याजवळ दबा धरून बसायचा आणि हातात असलेल्या बॅटरीचा वापर करून वीजेचे सर्किटने सुरुंगासह पेरलेल्या डेनोनेटरचा आणि सुरुंगाचा स्फोट घडवून आणायचा. त्यानंतर होणा-या गोंधळाचा उपयोग करत तो नाहीसा होत असे आणि सुरक्षा देणाऱ्या सैनिकांना काहीही सापडत नसे. या कारणास्तव आम्ही गाड्यांचा कॉन्वोय पाठवण्याआधी सैनिक तैनात करून रस्त्याचे इन्स्पेक्शन करीत असू आणि कॉन्वोय पार होईपर्यंत सैनिक तिथेच पहारा देत राहत होते. अशा प्रकारे आम्ही सुरक्षा बंदोबस्त करत असू परंतु सुरुवातीच्या काळात तरी एलटीटीईने प्रयत्न चालू ठेवले. जानेवारी १९८८ च्या रात्री जेव्हा माझे मुख्यालय मुतलाईतिवूला नुकतेच पोहोचले होते तेव्हा एका कॉन्वोयच्या दरम्यान मोठा स्फोट झाला व लगेच मला कळविले की सुदैवाने आमचे काही नुकसान झाले नव्हते, परंतु ज्या एलटीटीईच्या माणसाने स्फोट घडवला होतो त्याला मारण्यात आले होते व त्याची सहायक एक चौदा/पंधरा वर्षाची मुलगी आणि तिच्या आईला पकडले होते. स्फोटाचे स्थळ फार दूर नव्हते व मी स्वतः तिथे घटनेचा आढावा घेण्यासाठी थोड्या वेळेत पोहोचलो. ती रात्र आणि प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. सुमारे मध्यरात्र, भोवती दाट जंगल, स्फोटाच्या जागी भला मोठा खड्डा आणि थंडीच्या हवेत कोर्डाईटचा वास. पोहोचताच मी पाहणी केली व माझ्या समोर त्या माणसाचे शव होते व शेजारी उभी एक अगदी लहान दिसणारी मुलगी व थरथर कापत असणारी तिची आई. मुलीची चेहरा निर्विकार होता कारण आम्ही तिला नक्की ठार मारणार अशी तिची समजूत असावी. आम्ही सैनिक, आम्हाला पुरुषांशी लढण्याची सवय होती, परंतु एका मुलीवर हात उचलायचा कसा? मी एक दोन मिनिट सुरक्षा ठेवणा-या जवानांचे ऐकले व त्यांनी स्पष्ट पुरावा दाखवला की याच मुलीने स्फोट घडवणा-या माणसाला सिग्नल दिला होता व मुलगा वाटावा म्हणून तिने घातलेला शर्ट पण दाखवला. तामिळ भाषेत पण त्या दोघींशी बोलणे अशक्य होते व माझ्या समोर मोठा पेच होता. काय करावे? एखाद्या मिनिटाच्या विचारानंतर मी त्या मुलीला जिवंत सोडण्याचा निर्णय केला व जवानांना तसे सांगितले. शिस्तीत वाढलेल्या सैनिकांनी फार वाद घातला नाही परंतु नाराजी व्यक्त करत वेगळे उभे राहीले. मुलीला आणि तिच्या आईला मी एवढे फक्त सांगितले की आम्ही भारतीय सैनिक बायकांवर हात उचलत नाही पर्तु परत जर पकडले तर ठार मारायला आम्ही विचार करणार नाही. आता वाचकाने ठरवावे की मी योग्य केले की नाही परंतु शांतीसेनेच्या शिस्तीचा धडा स्थानिक लोकांमध्ये पसरला पाहिजे हा माझा उद्देश होता. पुढे परत सामान्य लोकांशी वागताना आम्ही किती शिस्तबद्ध आहोत याची वारंवार प्रचीती देण्यात आली. परिणाम असा की एलटीटीईला आमच्या विरुद्ध उलट सुलट आरोप कधीच करता आले नाही.
コメント