top of page

ब्रिगेडियर रवी पळसोकर (निवृत्त)

001.jpg

ब्रिगेडियर रवींद्र रामराव पळसोकर यांचा जन्म १९४३ साली उमरावती (आजचे अमरावती), विदर्भ येथे झाला व त्यानंतरचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालमोहन विद्यामंदिर, शिवाजी पार्क आणि नंतरचे शिक्षण शेरवूड कॉलेज, नैनीताल येथे झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, भारतीय सैनिकी प्रबोधिनी, देहरादून येथे प्रशिक्षणानंतर ते डिसेंबर १९६२ साली २ गार्डस या नामांकित पलटणीत रुजु झाले. त्यांचे वडील कै. कर्नल राम पळसोकर आणि आता त्यांचे चिरंजीव ब्रिगेडियर धनंजय, यांनी पण २ गार्डस पलटणीत सेवा केली आहे.

सैनिकी सेवेत ते भारताच्या सर्व सीमांवर तैनात राहिले. १९७१मध्ये बांगलादेशच्या युद्धात त्यांनी भाग घेतला. १९८७ ते १९८९ या दोन वर्षांच्या काळात त्यांनी श्रीलंकेत तैनात असलेल्या भारतीय शांति सेनेच्या ७ इन्फंट्री ब्रिगेडचे अत्यंत जोखमीचे व संवेदनशील क्षेत्रात नेतृत्व सांभाळले. श्रीलंकेच्या उत्तर प्रांतात एलटीटीईच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुल्लाईतिवू जिल्ह्यात त्यांच्या ब्रिगेडने सर्वात अधिक व भीषण लढाईत पूर्ण दोन वर्षे भाग घेतला. फेब्रुवारी १९९३मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

सैनिकी सेवेच्या काळात त्यांनी १९७४-७५ साली ब्रिटीश आर्मीचे स्टाफ कॉलेज, कॅंबरली, सरे प्रांत येथे पदवी प्राप्त केली आणि १९८२-८३ काळात अमेरिकन आर्मीच्या कमांड व जनरल स्टाफ कॉलेज, फोर्ट लेव्हनवर्थ, कान्सास येथे पदव्युत्तर एम.एस. प्राप्त केली.

निवृत्तीनंतर १९९६ ते २००० मध्ये प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे संचालक पद सांभाळले व त्यानंतर ते सुमारे ४५ वर्षांच्या काळानंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी यानंतर मराठी वृत्तपत्रात स्तंभलेखन सुरु केले व मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आंतर-राष्ट्रीय संबंध व सैनिकी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करतात.

bottom of page