श्री गणेशाय नमः
मराठीत ब्लॉग मी पहिल्यांदा लिहीत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी मी इंग्रजी ब्ल़ॉग सुरू केला होता; परंतु काही कारणास्तव तो चालू ठेवणे शक्य नव्हते. आता स्वतःच्या वेबसाइटच्या निमित्ताने या लेखनाला सुरुवात करत आहे. या वेबसाइटवर केवळ लेखांचा समावेश न करता, सातत्याने वेगवेगळ्या विविध विषयांवर भाष्य करणे, अनुभव सांगण्यासाठी ब्लॉगच्या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे.
वृत्तपत्रांत स्तंभलेखन आणि ब्लॉग यांच्यातील फरक या निमित्ताने लक्षात येतो; तो म्हणजे वृत्तपत्रांमधील स्तंभलेखनाला काही मर्यादा आहेत. त्यामध्ये शब्दसंख्या आणि काळाचे बंधन प्रकर्षाने अधोरेखित होते. मात्र, ब्लॉगमध्ये सातत्य ठेवून एका विषयाच्या अनेक पैलूंवर भाष्य करता येते; त्याविषयीचे वर्णन, अनुभवकथन विस्ताराने करता येते. माझे लेखन संरक्षणविषयक किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांवर असले, तरी वैयक्तिक अनुभव आणि विशेषतः युद्धातील पाहिलेले प्रसंग यांचे वर्णन नियमित लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अधिक वाचनीय ठरतील, असे मला वाटते.
या लेखनासाठी श्रीलंकेत शांतिसेनेत माझा ब्रिगेडच्या कमांडचा काळ निवडला आहे. डिसेंबर १९८७ ते डिसेंबर १९८९ अशी पूर्ण दोन वर्षे मी आणि माझी ७ इन्फंट्री ब्रिगेड उत्तर श्रीलंकेतील मुल्लाईतिवू जिल्ह्यात ‘एलटीटीई’शी सामना करत होतो. या काळात भारतीय सैन्यांचे अद्वितीय शौर्य आणि कठीण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द मी जवळून अनुभवली. सामान्य वाचकांना याबद्दल कमी वाचायला मिळते व त्यामुळेच मी हा विषय निवडला आहे.
माझ्या मराठी लेखनाच्या प्रवासात अनेकांनी बहुमुल्य मदत आणि मार्गदर्शन केले आहे. त्यात सर्वश्री श्रीधर लोणी, निरंजन आगाशे आणि मधुबन पिंगळे यांचा मोठा वाटा आहे, सर्वांचे मनःपूर्वक आभार. वाचकांचे प्रोत्साहन आणि सहभाग असल्याशिवाय लेखकाची प्रगती शक्य नाही. गेल्या वीस वर्षांत अनेक वाचकांनी, पुरुष-स्त्री, तरुण-सीनिअर यांनी वेळोवेळी फोन करून किंवा लिहून माझे मनोधैर्य वाढवले आहे. आप्तेष्टांच्या शुभेच्छाही नेहमी सोबत असतात. सर्वांचे आभार मानून आज मी ब्लॉगलेखनाचा श्रीगणेशा करत आहे.
लोभ असावा ही विनंती!
留言