डिसेंबर १९८७च्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रमोशन होऊन श्रीलंकेत ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचा कमांडर म्हणून माझी बदली झाली आणि काही दिवसांत मी श्रीलंकेत हजर झालो. जाफनात ऑक्टोबरमध्ये एलटीटीईशी सुरू झालेली लढाई आता डिसेंबरच्या अखेरपर्यंत उत्तर आणि पूर्व प्रांताच्या इतर क्षेत्रात पसरली होती. एलटीटीईची क्षमता आणि बळ पाहून भारतीय शांतीसेनेची कुमक वाढवण्यासाठी संख्या वाढत होती व त्या सर्व गोंधळात मी पण सामील होतो.
मी पोहोचलो तेव्हा माझे ब्रिगेड मानकुलम नावाच्या जागेत होते, परंतु ब्रिगेडच्या तिन्ही पलटणी वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. जाफना अनुराधापुरा-कोलंबो महामार्गावर मानकुलम एक लहान गाव होते. एलटीटीई मार्गांवर ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर वारंवार हल्ले करत होते आणि भारतीय सैन्याच्या गाड्यांच्या ताफ्यांना विशेष लक्ष्य करत होते. मी पोहोचलो तेव्हा आमचं नेमके काम काय होते, हे स्पष्ट केलेले नव्हते. एकंदरीत पूर्ण आयपीकेएफमध्ये आपण नेमके कशासाठी तैनात केले गेले आहोत याचे लेखी आदेश नव्हते, व पुढे पण कधी दिले गेले नाहीत.
परंतु आम्ही तिथे हजर होतो, आणि स्वस्थ बसून राहिलो असतो तर एलटीटीईला आमच्यावर बिनधास्त हल्ले करण्याची संधी होती. काहीही नाही तरी स्वतःच्या संरक्षणासाठी आम्हाला एलटीटीईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत माझे ब्रिगेडच्या पलटणीनी आपापल्या क्षेत्रात नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आणि एलटीटीईशी चकमकी वाढत गेल्या. मनात मी ठाम होतो की जर मी एलटीटीईच्या मागे लागलो नाही तर ते आम्हाला पळवून लावतील. मी नेहमी आपल्या ब्रिगेडला सांगत असे, "better we keep them busy rather than they keep us busy." सुरुवातीपासून आमच्या कारवाईबद्दल मी काही नियम ठरवले.
सर्वप्रथम म्हणजे आम्ही असे काही करायला नको ज्याच्यामुळे आपल्या देशाला आणि सैन्याला आणि आमच्या स्वतःच्या प्रतिमेला ठपका लागेल. थोडा खुलासा आवश्यक आहे. लढाईच्या मैदानावर शिस्त पाळणे फार महत्वाचे असते, उदा. स्त्री, बालकांवर हात उचलायचा नाही, कितीही आकर्षक वस्तू सापडली तर ती उचलायची नाही आणि सामान्य नागरिकांना स्वार्थासाठी त्रास द्यायचा नाही. दुसरा नियम मनात दृढ केला की चूक झाली तर मान्य करायची व खोटे रिपोर्ट कधी द्यायचे नाहीत, मग त्यात स्वतःचे कितीही नुकसान झाले तरी चालेल. हे दोन नियम मी आणि माझ्या कमांडने काटेकोर प्रमाणाने पाळले.
थोडक्यात सुरक्षा पाळणे हे आमचे काम होते. विशेष म्हणजे सर्व शासकीय कर्मचारी जाफनात राहायचे व गरजेनुसार आपापल्या कार्यालयात हजेरी दाखवण्यासाठी यायचे. याचा परिणाम होता की जिल्ह्यात सर्व काम जवळपास ठप्प झाले होते व जे काही होत असे ते एलटीटीईच्या आदेशानुसार असे. समजा त्यांनी हुकुम काढला की उद्यापासून बससेवा सुरू होईल तर तसे होत असे, हीच स्थिती शाळांबद्दल पण होती. एलटीटीई कोणालाही जीवे मारण्यास मागेपुढे पाहत नसत, म्हणून सामान्य माणसांना काही करता येत नव्हते.
अशा वातावरणात आम्ही तिथे पोहोचलो व एलटीटीईशी चकमकी सुरू झाल्या. सुरुवातीला आम्हाला बरेच नुकसान सहन करावे लागले, परंतु अनुभवाने आपले सैनिक यथायोग्य उत्तर देऊ लागले व एलटीटीईला आपली सत्ता चालवणे कठीण झाले.
मुलाईतिवूला काही मिळायचे नाही व आम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट भारतातून आणावी लागे. गाव समुद्र तटावर असल्याने मासेमारीचा धंदा चालू राहिला व त्यात कोणी बाधा आणली नाही. आमचे सर्व राशन बाहेरून येत असल्याने मी माझ्या उपअधिकारींना स्थानिक विक्रेत्याकडून मासे पुरवण्याची व्यवस्था करायला सांगितली, व एक दोन दिवसांनी त्यांनी हे झाल्याचे मला सांगितले. शासकीय नियमाप्रमाणे असे स्थानिक खरेदी करण्याची परवानगी असते.
याचा परिणाम काय होऊ शकतो याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याच दिवशी संध्याकाळी एलटीटीईने आदेश काढला की भारतीय शांतीसेनेशी कोणीही काही संबंध ठेवायचे नाहीत, आणि दहशत पसरवायला ज्या विक्रेत्याशी आम्ही करार केला होता त्याला एक पथदिव्यावर बांधून सर्वांच्या देखत गोळी मारून ठार केले. ही जागा आमच्या सैनिकांच्या पोस्टपासून दूर होती, त्यामुळे कळायला वेळ लागला.
माझ्या तोपर्यंतच्या सैनिकी अनुभवात असे होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मी काय करावे हे मलाच समजेना, परंतु एलटीटीईला उत्तर देणे आवश्यक होते. अखेर मी जशास तसे चांगले प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. दोन एक दिवसांत एका चकमकीत एलटीटीईचा माणूस ठार झाला तेव्हा मी त्या तुकडीला आदेश दिला की त्याचे शव गावातील त्याच पथदिव्यावर ठेवून या आणि जे नागरिक पाहत होते त्यांना एलटीटीईला कळवायला सांगा की आम्हाला असे करणे आवडत नाही, परंतु एलटीटीईची अशी कृत्ये आम्ही सहन करणार नाही. त्यानंतर असा प्रसंग परत आमच्या क्षेत्रात घडला नाही. एलटीटीईशी कसे वागावे याचा पहिला धडा आम्ही शिकलो. (क्रमशः)
पुढे – कॉन्वायच्या रस्त्यावर सुरुंगाचा स्फोट आणि पकडलेली मुलगी –
Comentarios